Monday, 22 August 2011

भ्रष्टाचारावर एकचएक उपाय नाही: पंतप्रधान


कोलकाता: लोकपाल विधेयकासंबंधी तात्त्विक चर्चा करण्यास केंद्र सरकार तयार आहे, पण भ्रष्टाचाराची समस्या सोडविण्यासाठी एकचएक उपाय आहे असे समजणे योग्य नाही, असे पंतप्रधान मनमोहन सिंग यांनी आज (सोमवारी) सांगितले.

इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेन्टच्या सुवर्ण महोत्सवी समारंभामध्ये बोलताना सिंग म्हणाले, 'आम्ही विधेयक संसदेमध्ये मांडले आणि आता ते स्थायी समितीपुढे आहे. विधेयकाच्या तपशिलाबद्दल मतभेद आहेत.'

'विधेयकाच्या विविध पैलूंबद्दल ज्या व्यक्तींना आक्षेप आहेत त्यांनी ते संसदेतील त्यांच्या प्रतिनिधींपर्यंत व स्थायी समितीपर्यंत पोचवावेत हे आम्ही स्पष्ट केले आहे', असे पंतप्रधान म्हणाले.

या सर्व प्रश्नांवर तात्त्विक चर्चा करण्यास आम्ही तयार आहोत, असे पंतप्रधानांनी पुन्हा एकदा सांगितले.

स्वातंत्र्यदिन समारंभावेळच्या आपल्या भाषणाचा संदर्भ देऊन पंतप्रधान म्हणाले, 'मी (त्या भाषणात) सांगितले होते की, भ्रष्टाचाराची समस्या एका झटक्यात सोडविण्यासाठी कोणतीही जादूची छडी नाही. एकचएक उपाय त्यासाठी नाही. विविध आघाड्यांवर आपल्याला लढावे लागणार आहे.'

'लोकपाल संस्था निर्मितीमुळे मदत नक्कीच होईल पण त्यामुळे समस्या सुटेल असे नाही. बरोबरीने आपल्याला न्यायालयीन प्रक्रियेच्या गुणवत्तेमध्ये व गतीमध्ये सुधारणा कराव्या लागतील', असे सिंग यांनी सांगितले.

No comments:

Post a Comment