Monday, 22 August 2011

पुण्यातील तरुणाईचा अण्णांना अनोखा पाठिंबा


 
पुणे - सामाजिक कार्यकर्ते अण्णा हजारे यांना भ्रष्टाचारविरोधी आंदोलनात अनेक जण विविध मार्गांनी पाठिंबा देत आहेत. पुण्याचे दोन तरुण अशाच एका अनोख्या मार्गाने अण्णांच्या उपोषणाला पाठिंबा दर्शवत आहेत.

याबद्दल ई-सकाळशी बोलताना अयुबखान पठाण म्हणाले, "अण्णांना पाठिंबा द्यायचाच हे आम्ही पक्के ठरविले होते. अशातच आम्हाला ही कल्पना सुचली. आमचे स्वतःचे इलेक्‍ट्रिकल्सचे दुकान असल्याने, आम्ही सौर ऊर्जेवर चालणाऱ्या छोट्या "एलईडी' दिव्यांच्या साह्याने आमच्या शर्टावर "आय एम अण्णा' अशी अक्षरे लिहिली आहेत.''

"अलाईट इलेक्‍ट्रिकल्स अँड इलेक्‍ट्रॉलिक्‍स'चे आयुबखान पठाण व इमरानखान पठाण या काका-पुतण्यांनी मिळून "सोलर एलईडी लाईटिंग' तयार केले आहेत. सौर ऊर्जेवर चालणारे हे दिवे त्यांनी त्यांच्या शर्टावर केले आहे. हे शर्ट परिधान करून दोघे जण शहरातील वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन अण्णांना त्यांच्या आंदोलनात पाठिंबा देत आहेत.

या दोघांची ही अनोखी कल्पना सर्वांनाच खूप आवडली व ते जातील तिथे लोकांनी या संकल्पनेला चांगला प्रतिसाद दिला, असा दावा पठाण यांनी केला. या दिव्यांची क्षमता विचारली असता पठाण म्हणाले, "सुमारे दोन तास सौरऊर्जेवर "चार्जिंग' केल्यानंतर सुमारे 32 तास हे दिवे चालू राहतात.'' या दोघांच्या शर्टवर दिव्यांच्या साह्याने राष्ट्रध्वज, अण्णा हजारे यांचा फोटो तसेच "आय एम अण्णा' असे लिहिले आहे.                        

No comments:

Post a Comment