Monday, 22 August 2011

अण्णांनी निवडणूक लढवून दाखवावी

कॉंग्रेसचे खासदार महेश जोशी यांचे आव्हान
जयपूर -  जयपूर येथून निवडणूक लढविण्याचे आव्हान खासदार महेश जोशी यांनी अण्णा हजारे यांना दिले आहे. ""अण्णांनी निवडणूक लढविण्याची हिम्मत दाखविली, तर मी राजीनामा देऊन पुन्हा निवडणूक लढविण्यास तयार आहे. कोणाला किती लोकांचा पाठिंबा आहे, हे तेव्हाच कळेल,'' असे जोशी यांनी म्हटले आहे.

""चांदणी चौक या मतदारसंघातील 85 टक्के लोक कपिल सिब्बल यांच्या विरोधात आहेत, असा दावा अण्णा करतात; मग त्यांच्याविरुद्ध ते का लढत नाहीत,'' असा प्रश्‍न जोशी यांनी उपस्थित केला आहे. जोशी हे कॉंग्रेसचे खासदार आहेत. त्यांच्या निवसस्थानी अण्णांच्या समर्थकांनी आज घेराओ घातला व तुम्ही पक्षाबरोबर आहात की जनतेबरोबर, अशी विचारणा केली. त्यावर त्यांनी पक्षाबरोबर असल्याचे उत्तर दिले.
""कॉंग्रेसने निवडणूक जाहीरनाम्यात जनलोकपाल विधोयकाबाबत काहीही म्हटले नव्हते. जनता त्याचे समर्थन करण्यासाठी सांगू शकते; परंतु ते आमच्यावर बळजबरी करू शकत नाहीत. आम्ही निवडणुकीच्या वेळी दिलेली आश्‍वासने पाळली नसतील तर जनतेची माफी मागण्याचीही तयारी आहे,'' असे जोशी म्हणाले.

""आपण कधी भ्रष्टाचार केला नाही व भविष्यात करणार नाही, असे प्रतिज्ञापत्र आंदोलनला पाठिंबा देणाऱ्या भाजप आणि त्याच्या सहकारी पक्षांकडून हजारे यांनी लिहून घ्यावे,'' असे आवाहनही जोशी यांनी केले. 

No comments:

Post a Comment